Home1

Friday, November 27, 2009

समाजदर्शन

जुलै महिन्यात यवतमाळमध्ये जाण्याचा योग आला. सोबत उमेश आणि दत्ता भाऊ होते. यवतमाळ मधून पुढे आम्ही जयश्री आणि संतोषच्या घरी जाणार होतो. जयश्री उमरखेडची तर संतोष तिथूनचं 25-30 किलोमीटरवर असलेल्या मन्याळी या गावचा. आम्ही दुपारहून निघालो. यवतमाळपासून उमरखेड एकशे दहा किलोमीतर अंतरावर. रस्ता अतिशय सुंदर होता. नुकतीच पावसाची हलकी सर होवून गेली होती. दुतर्फा जंगलं होतं. सर्वाधिक शेतक-यांच्याह आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात आम्ही आहोत यावर आमचासुद्धा विश्वास बसत नव्हता. विदर्भाच्या नैसर्गिक संपन्नतेचं दर्शन आम्हाला होतं होत. प्रवास संपूचं नये, असंचं आम्ही म्हणत होतो.
दोन तासांनंतर महागावहून उमरखेड फाट्यावर लागलो. दुपारचं जेवण घाईत करायचं राहीलं होतं. उमरखेडला जयश्रीचा पाहूणचार घेऊन बिटरगावच्या दिशेने निघालो. तिथं पोहचल्यावर एका वयस्क बाबांना विचारलं, बाबा मन्याळी कुणीकडे आलं ?. त्यांनी एका लहानश्या डावीकडील फाट्याकडे हात केला. रस्ता चिंचोळा होता. रस्त्याचं बांधकाम चालू होतं. एकूणचं परिस्थितीवरून काम बर्या चं दिवसांपासून रेंगाळलेलं असावं असं वाटत होतं. गावातील लोक सुद्धा त्या तश्या रस्त्याला सरावलेले दिसत होते.

दोन किलोमीटर प्रवास केल्यानंतर एका जि.प. शाळेसमोर आलो. गावं लहानं होतं. “दादा इथं पत्रकार संतोष कुठे राहतो” एका वयस्क माणसाला विचारलं. त्यांनी सुद्धा आंम्हाला फार काही न विचारता गावाच्या एका कोपर्यााच्या दिशेने हात करत म्ह्टलं, “त्या झाडाजवळ”. तेवढ्यात मागून संतोष धावतच आमच्याजवळ आला. आम्ही सतोषच्या घराच्या दिशेने चालू लागलो. आजूबाजूची सगळीचं लोकं आमच्याकडे आणि संतोषकडे पाहतं होते.

अंगणात संतोषने आमच्यासाठी चारपाया टाकल्या. आजूबाजूची काही माणंस त्यानिमित्ताने गोळा झाली. मगं काय आमच्या गप्पा सुरु झाल्या. तांड्यावरची काही मंडळीसुद्धा आमच्या गप्पांमध्ये सामील झाली होती. त्यातून बर्या चं गोष्टींचा उलगडा होत गेला.

गप्पा मारता मारता कळलं की आम्ही फिरत फिरत विदर्भातून मराठवाड्याच्या अगदी जवळ पोहचलो होतो. नांदेड मधला किनवट तालुका तिथून ७-८ किलोमीटरवर होता. गावाला किनवटच्या जंगलाचं देणं लाभलं होतं. गाव तसं लहानचं होतं. गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा होती. संतोषचं सातवीपर्यंतचं शिक्षण तिथेचं झालं होतं. बिटरगाव - मन्याळी रस्ता कच्चाचं होता पण संतोषच्या घरासमोरील रस्ता कसा कोण जाणे चक्क सिमेंटचा होता. संतोषचं घर साधं मातीचंच होतं. संतोषचा लहान भाऊ ज्ञानेश्वर हुशार आणि स्मार्ट आहे. त्याला शेतीमध्ये रस आहे. ज्ञानेश्वरला शेतीची सर्व कामे जमतात आणि तो ती करतो असं संतोषच्या बाबांनी आवर्जून सांगितल. “आम्ही गावात एकरी उत्पादन सर्वात जास्त घेतो” ज्ञानेश्वरने आम्हाला अभिमानाने सांगितलं.

आमच्या गप्पांमध्ये एक तांडयावरचे काकासुद्धा सहभागी झाले होते. सर्वसाधारणपणे तेथिल गावच्या रचनेप्रमाणे गावाबाहेर बंजारा समाजाची वस्ती असते. पूर्वी हे बंजारा लोक गावोगाव भटकत असत, पण गेल्या काही पिढयांपासून गावाबाहेर वस्ती करून स्थायिक झाले आहेत. त्या वस्तीला ते तांडा असे म्हणतात. त्यावरून मला लहानपणी दूरदर्शनवर सयाजी शिंदेच्या तांडा चालला या मालिकेची आठवण झाली.

गप्पांतून अनेक विषय निघत होते. गावात शेती व्यतिरीक्त रोजगाराचं काहीचं साधनं नसतं त्यामुळे खरीपानंतर गावातील आणि तांडयातील लोक बर्या चं प्रमाणात स्थलांतर करतात असं लोकांच्या बोलण्यातून लक्षात आलं.

“मी पण मजूरीसाठी बांधकामाच्या कामावर जायचो पण ते आता दोन-तीन वर्षापासून बंद केलं” ताडयावरचे काका सांगत होते.

मी मुंबईचा आहे हे कळल्यावर ते म्हणाले, “मी मुंबईत सुद्धा माहीम, बांद्र्याला आणि जोगेश्वरीला कामं केली आहेत.”.

मी लगेचचं म्हटलं, “मी सुद्धा जोगेश्वरीलाच राहतो”

”मग तुमच्याकडे ते राम मंदीर आहे ना?” काका म्हणाले, “त्याच्या मागच्या बाजूला ‘राणे मिलेनियम’ नावाची बिल्डींग आहे ना ती मीच बांधली आहे.”

ती बिल्डींग माझ्या खाडकन डोळ्यासमोर आली. ईस्माईल युसुफच्या ग्राऊंडवर क्रिकेट खेळल्यानंतर राणे मिलेनियमच्या समोर रस्त्याच्या कोपर्या्वर असलेल्या अण्णाच्या गाडीवर मी कित्येकवेळा मित्रांसोबत मसाला डोसा खाल्ला होता.

कुठे विदर्भातील यवतमाळ, त्या यवतमाळच्या सोळा तालुक्यापैकी एका कोपर्यारत असलेला उमरखेड हा तालुका, त्या तालुक्यातील बिटरगावाजवळचं मन्याली नावाचं एक लहानसं खेड, त्या खेडयातील गावाबाहेरच्या तांडयावरचे हे काका आणि कुठे मुंबईच्या उपनगरातील एका कोपर्यांत असलेल्या जोगेश्वरीतील “राणे मिलेनियम” ही बिल्डींग.

रोजगारासाठी माणूस किती दूर फेकला जातो. स्थलांतराचं विदारक स्वरूप माझ्यासमोर होत. स्थलांतराची समस्या किती गंभीर आहे हे समजण्यासाठी त्याचे परिणाम व आकडेवारी सांगणार्या वर्ल्ड बँकेच्या अहवालाची मला आता गरज वाटत नव्हती. लोक उत्तर प्रदेश बिहार मधून मुंबईत कामासाठी येतात हे माहीत होत, पण आता तर महाराष्टाचं सुद्धा युपी-बिहार होत चालल आहे याची जाणीव झाली. एकदम पी. साईनाथांचं “Everybody loves…” आठवलं. असे कितीतरी काका भारताच्या कानाकोपर्‍यातून बांधकामासाठी, रस्ते खणण्यासाठी, गटारं साफ करण्यासाठी, मैला काढण्यासाठी, कचरा गोळा करण्यासाठी मुंबईत येतात. आपल्याला जी कामं नकोशी वाटतात, जी कामं करायला आपण तयार नसतो ती कामं करतात. आपण त्यांची कधीचं दखलं घेत नाही.

कदाचित हा माणूस बिल्डींगच्या विटा रचत असताना मी त्या समोरच्याचं गाडीवर डोसा मित्रांसोबत खाल्ला असेन. पण हा माणूस कोण, कुठला आणि तो इथ अशी कामं का करतोय? हा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही. किंबहुना त्यावेळी असा विचार करायचा असतो हेचं माहीत नव्हत. परंतु तेच काका त्यांच्या गावात माझा चांगला पाहुणचार करत होते.

त्यावेळी माझ्या असंवेदनशीलतेची मलाच खंत वाटली…


No comments: